रविवार, १५ जानेवारी, २०१२

तीळ गूळ घ्या ... !













स्नेहाचा प्रेमाचा सण हा आला 
आनंदाचा गोडवा मनाला झाला 
तीळ आणि गुळाची स्निग्धता भारी 
प्रेमाची नाती जपू  आपल्या उरी 
नात्यांना अर्थ येवो घरोघरी 
मायेच्या पडाव्यात अंगणात सरी
तुमच्या माझ्या ह्रदयातील गोडवा 
द्वेष आणि अहंकाराचा गुंता सोडवा 
चला माणुसकीची नाती जोडू यात 
तीळ गुळाच्या गोडीने प्रेम वाढवू यात 

मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !

        -- बिपीन जगताप 

सोमवार, २ जानेवारी, २०१२

एका जिद्दी उधोजकाची कहाणी ......


....


'अशक्य'  हा शब्द ज्यांच्या जवळ नसतो तेच  विजेते होतात..... उराशी बाळगलेले मोठे  स्वप्न साकार करण्यासाठी  जिद्द आणि चिकाटीने ते धावत असतात.... कमालीचे दारिद्र, त्यांना रोखत नाही ... ते धावतात एका ध्यासाने एका ध्येयाकडे ......आणि एक दिवस तो विजयाचा आनंद त्यांच्या कवेत येतो. .....अशाच एका  जिद्दी तरुणाची हि कहाणी........ मोहोळ तालुक्यातील अनगर येथील विष्णू रामदास थिटे या तरुणाने दहावीत असताना आपण दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा उधोजक होऊ दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण इतर लोकांना नोकरी देऊ असे स्वप्न पहिले. ..  आणि  जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, योग्य नियोजन करत आज ते स्वप्न 'लोकनेता ट्रक्टर नांगर कारखाना' या स्वरुपात साकार झाले आहे. विष्णू थिटे याने किमान २५ लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.  
असे स्वप्न पाहताना आपण अनेकदा वास्तवाचा विचार करतो पण अश्यक्य वाटणारे हे स्वप्न पाहताना विष्णू थिटे यांनी आपल्या दारिद्र्याचा विचार केला नाही. घरची प्रचंड गरिबी. आई वडील दोघेही  शेत मजूर, झोपडीत राहणारा  विष्णू मात्र आपल्या मनाला  मोठा 'उधोजक' बनणार असे ठामपणे सांगत असे. विष्णूला दोन भाऊ एक ब्रह्मदेव आणि दुसरा महेश. ब्रह्मदेव  गंरेज मध्ये काम करत असे तर महेश शिक्षण घेत होता. विष्णू ने दहावी नंतर सोलापूर येथील आय.टी.आय मध्ये सुतार कामाचा ट्रेड पूर्ण केला. हा आय टी आय पूर्ण करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. जेवणासाठी पैसे नसत त्यावेळी घरून सहा दिवसाच्या गुळाच्या पोळ्या करून तो आपल्या बरोबर घेऊन यायचा. शिक्षण पूर्ण करत  असताना गरिबीमुळे अनेक चटके सहन करावे लागत होते. आई वडील शेतात काम करत असत पण तेवढ्या पैश्यात घरचे भागत नसे. विष्णू ने एक वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आय. टी. आय मध्ये असताना तो उधोगाचा विचार करू लागला होता. आपला एखादा उधोग असावा असे त्याला वाटू लागले. पण उधोग करण्यासाठी जागा, मशिनरी, भांडवल लागते आणि त्यासाठी आपल्याजवळ एवढा पैसा नाही याचीही जाणीव विष्णूला होत असे. पण हे सारे असताना तो उधोजक होण्याची  स्वप्ने पाहत होता. ती साकार करण्यासाठी तो काही नियोजनही करत असे पण पैश्याचे सोंग घेता येत नाही हे तो विसरत नसे.
एक वर्षानंतर तो घरी आला. सुतार कामापेक्षा दुसरा काही उधोग करता येईल का असा विचार त्याच्या मनात येत होता. एक दिवस  वडिलांनी आपल्या बरोबर त्याला शेतीच्या कामावर नेले.  शेतातील कामानंतर त्याला जाणीव झाली कि दुसऱ्याची गुलामी आपणाला करायची नाही. आणि त्याने पुण्यातील राजगुरू नगर येथे जाऊन एखादा नवीन उधोग शिकण्याचा  निर्णय घेतला. वडिलांना त्याने आपला निर्णय सांगितला काही पर्याय नसल्याने वडिलांनी होकार दिला. विष्णू पुण्याला गेला. एका वेल्डिंग वर्कशॉप हेल्पर म्हणून तो काम करू लागला. विष्णूचे मन त्याला गप्प बसू देत नव्हते. वेल्डिंग चे काम शिकण्याची त्याने सुरुवात केली. हळू हळू त्याला वेल्डिंग काम जमू लागले. विष्णूला त्या ठिकाणी पगार मिळत नव्हता फक्त जेवणावर त्याने आपले शिक्षण सुरु केले. कोणताही गुरु नसताना एकलव्य प्रमाणे त्याने आपली विद्या घेण्यास सुरुवात केली.  त्याची उधोजक बनण्याची साधना सुरु झाली होती. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्याला इतर लोकही मदत करू लागले. त्याच्या काम शिकण्याची धडपड पाहून सर्व कामगार अचंबित होत. 
एक ते दीड वर्षाचा कालावधी गेला. विष्णूला वेल्डिंग उधोगाची माहिती झाली. पण दुर्दैवाने  तो ज्या ठिकाणी काम करत होता तो उधोग बंद झाला. विष्णू घरी आला. पुन्हा दुसऱ्याचा शेतावर काम करावे लागेल. पुन्हा ती गुलामी या विचाराने विष्णू विषन्न झाला. अचानक एक दिवस त्याने राहिलेली वेल्डिंग काम  कोल्हापूर येथील अम आय डी सी येथे जाऊन चांगल्या वर्क शॉप मध्ये घ्यायची असे त्याने ठरिवले. पण नात्याचे अथवा जवळचे असे कुणीही कोल्हापूर येथे नव्हते. तरीही उधोगासाठी जायचेच असे पक्के ठरवून विष्णू ने लागणारी कपडे, भाकरीचे पीठ, स्टोव्ह, असे सामान घेऊन कोल्हापूरला गेला. दोन दिवस बस स्थानकावर राहून तिथेच स्वयंपाक  करून विष्णू कामाचा शोध घेत होता. एका चांगल्या वर्क शॉप मध्ये त्याला काम मिळाले. पण पुन्हा तशाच प्रकारे फक्त जेवण आणि राहण्याच्या अटीवर. इकडे घरी न सांगता आलेल्या विष्णूवर घरातील सगळेच रागावले होते. 
इकडे विष्णू वर्क शॉप मधील काम करत होता आणि संध्याकाळी बाहेर मार्केट यार्ड येथे हमाली करत होता काही पैसे भावाच्या शिक्षणाला पाठवत असे. कोल्हापूर येथे वेल्डिंग आणि इतर शिक्षण परिपूर्ण  झाल्यानंतर एक वर्ष नंतर विष्णू आपल्या गावी आला. पुरेसे पैसे नसल्याने विष्णू गावातील छोट्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे जमवून त्याने एक वेल्डिंग करण्याचे मशीन घेतले. घरी छोटा उधोग उभा राहिला. आणि एक संधी अचानक विष्णूच्या जीवनात आली. अनगर येथील माजी  आमदार राजन पाटील साहेब यांच्या ट्रक्टर चा डबल पलटी नांगर  तुटला तो दुरुस्तीला पंढरपूरला जात होता पण विष्णूने आलेली संधी ओळखली नांगर अनगर येथेच दुरुस्त करून दिला. आमदार साहेबांनी विष्णूला बोलावले. उधोगासाठी मदत केली. गावातील रस्त्याच्या बाजूची जमीन विष्णूला  उधोगासाठी दिली. शिवाय बँक स्तरावरून लागणारे भांडवल उपलब्द करून देण्याचे आश्वासन दिले. विष्णू बँकेत आला. देणा बँक ने विष्णूला  सोलापूर येथील खादी  ग्रामुधोग मंडळाचा पत्ता दिला. मंडळाने  विष्णूची  जिद्द धडाडी पाहून मार्जिन मनी या योजनेतून प्रकरण मंजूर केले. शासनाचे अनुदान आणि मदत मिळाल्याने विष्णू खुश झाला.
देणा बँक आणि खादी ग्रामुधोग यांच्या मदतीने विष्णू थिटे हा गरीब तरुणाची स्वप्ने साकार झाली. विष्णूने  आपला उधोग सुरु केला. छोट्या स्वरुपात सुरु झालेला हा उधोगाने आज मोठे रुपात उभा राहिला आहे.  लोकनेते ट्रक्टर नांगर, लोकनेते ट्राली असे उत्पादन सुरु झाले आहे.
विष्णूने तयार केलेले नांगर तुटत नाहीत. त्याच्या अवजारांचा दर्जा खूप चांगल असतो असे ग्राहकांचे मत आहे. त्याची उत्पादने सांगली, उस्मानाबाद,पुणे, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात जातात. अनेक शेतकरी त्याचा नांगर मिळावा यासाठी प्रतीक्षेत असतात. काल राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  प्रा.लक्ष्मनराव ढोबळे, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते विष्णूच्या कारखान्याचे उद्घाटन संपन्न झाले. विष्णू आपले उधोगाचे कहाणी सांगत असताना त्याचे डोळे पाणावले होते. पण एक अश्यक्य प्राय वाटणारे स्वप्न साकार झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर लपत नव्हता.   

बी. बी. जगताप 
जिल्हा ग्रामुधोग अधिकारी सोलापूर 

   



सोमवार, २६ डिसेंबर, २०११

भेद अमंगळ.........


 

साऱ्या जगाला तूच घडविले 
भेद माणसाने निर्माण केले 
जाती धर्मात वाटून टाकले 
माणूसपण सारे वाया घालवले !!१!!

एकच  वारा सूर्य  प्रकाश 
मोकळे बघ अथांग आकाश 
दुभंगून सारी निसर्गाची नाती 
वाटून टाकली काळी माती !!२!!

कशाला भेद करतो माणसा 
तूच चालव  निसर्गाचा वसा 
नको जाती, धर्म, रंग व रूप
मायेची नाती माणुसकी जप !!३!!
 
किती करशील माणसाचा द्वेष 
किती घेशील निसर्गाचा रोष 
सावध होऊन माणुसकी वाढवू 
निसर्ग नियमांचे पालन करू  !!४!!

--- बिपीन जगताप 

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

आयुष्याची संध्याकाळ












आयुष्याच्या संध्याकाळी दाटून आल्या आठवणी 
सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील हळूच मिटली पापणी

भूतकाळातील  सुखातून परतून यावे वाटेना  
आनंदाच्या झाडाची घट्ट्  मिठी आज सुटेना 
कल्पनाच्या भरारीवर माझा वारू थांबेना 

घरट्यातूनच होईल माझी दूर आता पाठवणी 
आयुष्याच्या संध्याकाळी दाटून आल्या आठवणी 

डोळ्यातील आसवांना कसे कोणी रोखेना 
मनातील भावनांना शेवटचा दिस सोसेना 
संसारातील कोणावरच मी आज रुसेना 

तुझ्या माझ्या भेटीगाठी स्मरतील प्रत्येक क्षणी 
आयुष्याचा संध्याकळी दाटून आल्या आठवणी 

वास्तवाचे भान सांग कसे ठेवायचे 
दुख्हातून पुन्हा सांग कसे जायचे 
जीवनगीत गात वृध्द पाय हलवायचे 

सुंदर संगीत ऐकत डोलायचे आता मनी  
आयुष्याच्या संध्याकाळी दाटून आल्या आठवणी 
 
---  बिपीन जगताप 

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

निसर्ग आणि माणूस


                      

ब्रह्मांड विचारांच्या कक्षेत बसत नाही. विश्वाला  नियमात  बांधून ठेवत येत नाही . आकाशात पसरलेले अगणित तारे, ग्रह, यांचे मोजमाप करता येत नाही. सूर्याची आग आणि चंद्राची शीतलता कमी करता येणार नाही. सजीव सुर्ष्टीचा अभ्यास करणाऱ्यांना आजही मरण समजले नाही.  या सगळ्या सजीव  सुर्ष्टीत माणूस तसा सर्व सजीवांप्रमाणे एक जीव आहे. आपल्या बुद्धी कौशल्यावर काही अभ्यास करून या विश्वाची काही गूढ रहस्य त्यामागील ज्ञान शोधण्याचा खटाटोप माणूस नेहमी करत आला आहे. त्यातून काही विचारांनी काही प्रमाणे एकके शोधून काढली. काही निसर्गाच्या शक्तींचा शोध त्याने लावला आहे.  त्यातूनच मग सूर्याला दिवस रात्रीत मोजणे सुरु झाले अमवस्या पौर्णिमेचा पंधरवडा सुरु झाला. पण हे सगळे फक्त मोजकाम आहे. हजारो वर्षापासून आपण मोजण्याचे काम केले आहे. त्यातून ठोस असे अजूनही काही मिळत नाही. माणूस जन्माला कि त्याच्या वयाचे मोजमाप सुरु होते. पण सतत वाहणारा वारा, कोसळणारा झरा, यांना मोजता येत नाही. निसर्गाला आपल्या कवेत घेता येणार नाही. निसर्गाच्या प्रकोपाला रोखण्याची ताकद अजूनही माणसात निर्माण झाली नाही. 
माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. निसर्गाच्या अनेक रहस्यापैकी माणूस एक रहस्य आहे. माणसाला इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी शारीरिक ताकद जरी दिली असली तरी त्याला ज्ञान आणि बौद्धिक कौशल्य फार मोठ्या प्रमाणात दिले आहे.   
 निसर्ग आणि माणसाचे जीवन हे निसर्गाचाच एक कलाविष्कार आहे. आपल्या आसपास अनेक गोष्टी घडत असतात. पण अनेकदा त्या स्वप्नवत वाटतात. माणसाने अस्तित्वात नसणाऱ्या अनेक गोष्टीना जन्म दिला आहे. शरीरात किवा बाहेर कुठेही सापडत नसलेले मन माणसाने शोधले. रोज उगवणाऱ्या सूर्याला आणि चंद्राला त्याने रात्र दिवसात मोजायला सुरुवात केली. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीना माणसाने नाव दिले. प्रत्येकाचे नामकरण झाले. अशा अनेक बाबी आहेत ज्या माणसाने सुरु केल्या. जगात माणसाचा जन्म झाला त्यावेळी सगळी माणस सारखीच होती. कदाचित त्या वेळी आपण एक सारखे दिसत आहोत म्हणून आपण आपल्याला माणूस हे नाव शोधून काढले आणि आपणच या नावाचे आपल्यासाठी बारसे केले असावे. मग पुन्हा एक महत्वाची गोष्ट माणसाच्या लक्षात आली असावी माणसातही फरक आहे. एक स्त्री आणि दुसरा पुरुष. स्त्री असणारी शरीराने कमकुवत तर काही शारीरिक भेद दोघांमध्ये दिसू लागले .मग शरीराने कमकुवत असणाऱ्या स्त्री वर  पण निसर्गाचे तंत्र त्यांच्या लक्षात आले असावे आपल्या सारखीच माणस निर्माण करण्यासाठी निसर्गाची हि निर्मिती आहे. माणसाचा माणसाशी खरा भेद सुरु इथे सुरु झाला आहे असे मला ठामपणे वाटते. मग आजपर्यंत जे भेदामुळे मनुष्याचे नुकसान झाले आहे ते अगणित आहे.  
जात, धर्म, स्त्री,पुरुष, भाषा, रंग, प्रांत, गरीब, श्रीमंत,शहरी ग्रामीण, सुशिक्षित अडाणी, ज्ञानी,अज्ञानी, अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या भेदामुळे माणसाला माणसापासून तोडण्याचे काम केले आहे. निसर्गालाही या सगळ्याचे आश्चर्य वाटत असेल. निसर्गाने फक्त एक माणूस घडवला माणसाने सारा निसर्ग बिघडवला. त्याचे सारे नियम पायदळी घेऊन विश्वाचा रचिता मीच आहे म्हणू लागला. स्वतःची प्रतिमा पूजन करून आपल्याला देव म्हणू लागला. काही वर्षापूर्वी आणि आजही काही लोक निसर्गाची पूजा करतात. यात सूर्य, चंद्र, अग्नी, वारा, जमीन यांचा समावेश होतो. हुशार माणसाने काही पुस्तके लिहिली त्याला नंतर धार्मिक ग्रंथ नाव पडले असावे. त्यात माणसाने कसे वागावे धर्माचे पालन न केले तर काय होते. आणि अशा काल्पनिक मनातून कल्पनेचे अनेक धर्म जाती उभ्या राहिल्या यातून भेद निर्माण झाले. ज्यातून रक्त सांडले. संपूर्ण माणूस आणि निसर्गाचे अतोनात नुकसान झाले ते कशानेही भरून निघणारे नाही. 
मग माणसाने तयार केलेले हे मानव निर्मित जाती धर्म आणि इतर भेद संपवता नाही का येणार? माणसातील माणूसपण जागे करून त्याला निसर्गाशी एकरूप नाही का करता येणार? प्रेम आणि फक्त प्रेम देत जीवन नाही जगता येणार ? प्रत्येकाला इथे भीती आहे. हि भीती निसर्गातील प्राण्यांची, विध्वंसाची नाही तर माणूसपणाची आहे. माणूस माणसाला संपवतो आहे. हे थांबवण्यासाठी आपल्या सर्वाना माणूस म्हणून जगात असताना निसर्गाला जोपासत जगावे लागेल. अन्यथा माणूस हा या विश्वात खूप हुशार आणि सुंदर प्राणी होता असे एक दिवस म्हणण्याची वेळ निसर्गाला येईल. 


 बिपीन जगताप 








शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

गरिबी विकायला गेलो ..!




शहर फिरल्यानंतर खूप वर्षांनी वस्तीवर आलो 
वाऱ्याने छळून विस्कटलेल्या झोपडीत बसलो 
माझ्याच रक्ताची बहिण भाऊ लांब उभे होते 
 मला संकोचत बघत लाजत दूर जात होते 
आईने  फाटक्या पदराने तोंडावरचा घाम पुसला 
माझा 'साहेबी' वेश पाहून बाप दाराशी थबकला 
मी चटकन उठलो आई बापाचे पाय शिवलो 
तसा बाप  मागे सरकला 
चिखलाचे पाय मागे घेऊ लागला
खूप दिवस गेले होते घरादाराला सोडून 
धंदा शोधायला लांब शहरात जाऊन 
तुटक उभ्या बहिणीला जवळ मी घेतलं 
भावाच्या पाठीवर मायेच हात फिरवल 
त्या झोपडीत माझ्या उबदारपणा आला 
जेव्हा आईच्या हातानी जवळ मला घेतला 
बराच वेळ आई बोलत नव्हती 
डोळ्यातून तिच्या फक्त आसव सांडत होती
बापाकडे पाहून मी म्हणालो  
"गावाकडच्या गरिबीला विकायला शहरात गेलो 
काम करून थकून बाबा मीच कायमचा मेलो. 
पुन्हा तुमची आठवण यायची 
डोळ्यातून ती  पाझारायाची 
या झोपडीतील दारिद्र्याला 
भिऊन लपून बसायची" 
बाप काहीच बोलत नव्हता 
मुकेपणाने ऐकत होता 
बाहेरच्या उन्हाकडे पाहत 
माझ्या चेहरा निरखीत होता 
 मुकेपणाने बोलत होता 
"शहर आणि गाव दोन्हीत फरक असतुया 
 उन्ह आणि सावलीचा खेळ असतुया "
शहराने  दिलेल्या कपड्यात 
आणि बापाच्या फाटक्या धोतरात 
आईच्या पदराआड लपलेली गरिबी 
पुन्हा मला दिसू लागली   
काळ्या मातीकडे आणि अथांग आकाशाकडे 
एकाच वेळी नजर आमची गेली !

-- बिपीन जगताप 

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

माणुसकीची नाती:  चांगुलपणा  आप्पांचा ....!मी काल एका सेवानिवृत्त ...

माणुसकीची नाती: चांगुलपणा आप्पांचा ....!
मी काल एका सेवानिवृत्त ...
: चांगुलपणा आप्पांचा ....! मी काल एका सेवानिवृत्त होणाऱ्या अच्चुत ( आप्पा ) खजुरकर यांच्या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो....

manuskichi nati