शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

गरिबी विकायला गेलो ..!




शहर फिरल्यानंतर खूप वर्षांनी वस्तीवर आलो 
वाऱ्याने छळून विस्कटलेल्या झोपडीत बसलो 
माझ्याच रक्ताची बहिण भाऊ लांब उभे होते 
 मला संकोचत बघत लाजत दूर जात होते 
आईने  फाटक्या पदराने तोंडावरचा घाम पुसला 
माझा 'साहेबी' वेश पाहून बाप दाराशी थबकला 
मी चटकन उठलो आई बापाचे पाय शिवलो 
तसा बाप  मागे सरकला 
चिखलाचे पाय मागे घेऊ लागला
खूप दिवस गेले होते घरादाराला सोडून 
धंदा शोधायला लांब शहरात जाऊन 
तुटक उभ्या बहिणीला जवळ मी घेतलं 
भावाच्या पाठीवर मायेच हात फिरवल 
त्या झोपडीत माझ्या उबदारपणा आला 
जेव्हा आईच्या हातानी जवळ मला घेतला 
बराच वेळ आई बोलत नव्हती 
डोळ्यातून तिच्या फक्त आसव सांडत होती
बापाकडे पाहून मी म्हणालो  
"गावाकडच्या गरिबीला विकायला शहरात गेलो 
काम करून थकून बाबा मीच कायमचा मेलो. 
पुन्हा तुमची आठवण यायची 
डोळ्यातून ती  पाझारायाची 
या झोपडीतील दारिद्र्याला 
भिऊन लपून बसायची" 
बाप काहीच बोलत नव्हता 
मुकेपणाने ऐकत होता 
बाहेरच्या उन्हाकडे पाहत 
माझ्या चेहरा निरखीत होता 
 मुकेपणाने बोलत होता 
"शहर आणि गाव दोन्हीत फरक असतुया 
 उन्ह आणि सावलीचा खेळ असतुया "
शहराने  दिलेल्या कपड्यात 
आणि बापाच्या फाटक्या धोतरात 
आईच्या पदराआड लपलेली गरिबी 
पुन्हा मला दिसू लागली   
काळ्या मातीकडे आणि अथांग आकाशाकडे 
एकाच वेळी नजर आमची गेली !

-- बिपीन जगताप 

४ टिप्पण्या: