पावसा तुझा धिंगाणा थांबव आता
बाबा तुझ्या पायी ठेवते रे माथा !
किती दिवस पडतात तुझ्या या धारा
कसा बेभान वाहतोय गार हा वारा !
माझी चंद्रमोळी झोपडी झालीय ओली
कुठ ठेवू रे बाळांना नाही दुसरी खोली !
तुलाच करते हात जोडून विनवणी
माझा चेहरा बघ कसा झालाय दीनवाणी !
लेकरांना नाही बघ चार दिस भाकर
थांबव तुझ येण मग तुला देईन साखर !
तुझ येण असं कसं अवचित असतं
येवढं राहून सुद्धा जाण्याच भान नसतं!
येऊ दे रे दया तुला, या गरीब आईची
शपथ आहे तुला त्या डोंगर माथ्याची !
तूच खरा देव आहे, मी जाणते रे सारे
पण उघड आता तरी ती सूर्याची दारे !
-- बिपीन जगताप
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा