सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

 चांगुलपणा  आप्पांचा ....!

मी काल एका सेवानिवृत्त होणाऱ्या अच्चुत ( आप्पा ) खजुरकर यांच्या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. आप्पा ची सेवा कोरवली गावातील हायस्कूल मध्ये ३३ वर्ष झालेली. आप्पा १९७८ साली शाळेत शिपाई या पदावर संस्थेत लागले आणि निवृत्त होताना ते सिनिअर क्लर्क म्हणून निवृत्त झाले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्रमुख राजशेखर पाटील यांनी केले होते. हा कार्यक्रम खूप ह्र्द्यास्पर्शी झाला. आप्पांच्या सत्काराला सगळा गाव लोटला होता. अनेक शाळांचे हेडमास्तर तसेच त्यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी तेथे होती. आप्पा हे माळकरी पण खऱ्या अर्थाने अजातशत्रू आहेत असे वाटले. संपूर्ण गाव त्यांच्यावर प्रेम करत होते. या माणसाने आयुष्यात कधी कुणाला दुखावले नाही , कधी खोटे बोलून लुबाडले नाही, कुणाची फसवणूक करून टिंगल टवाळी केली नाही. अखंड प्रेमाचा झरा असलेल्या या माणसाने लोकांना फक्त प्रेम दिले, समजुतीचे चार शब्द सांगितले. अनेकदा मोठमोठ्या ग्रंथात माणसाचे षड्रिपू सांगितले आहेत, पण हा माणूस आपल्या जीवनात हे षड्रिपू बाजूला करत जीवन जगला आहे. काल बालदिन होता शाळेतील पाचशे मुल हा कार्यक्रम पाहत होती. अनेक प्राध्यापक शासकीय नोकरदार येऊन आपांच्या सहकार्याने त्यांच्या मदतीने आपण आज कसे पुढे गेलो हे साश्रू नयनांनी सांगत होते. गावातील अनेक महिला आपल्या डोळ्यांना पदर लावत होत्या प्रत्येकजण आतुर नजरेने आप्पांचा  हा सत्कार समारंभ पाहत होते . या माणसाला कधी अहंकार शिवला नाही, कधी राग आला नाही , कधी मनात द्वेष आला नाही. या माणसाने फक्त माणुसकीची नाती जोडली आणि ती निभावली. त्यामुळेच शेवटच्या दिवसात त्यांच्यावर माणसांचे प्रेम उफाळून आले होते. आप्पांची वृद्ध आई हा सोहळा डोळ्यात साठवत समोर बसल्या होत्या.  
कोरवली गावात आप्पाना  बिनविरोध सरपंच करण्यात आले. पण गावच हे महत्वाचे पद लोकांच्या कल्याणासाठी असते हे त्यांनी शेवटपर्यंत जपले आणि गावच्या विकासात भर घातली. शाळेची नोकरी सेवा म्हणून  केली. त्यात वेळेचे गणित कधी मांडले नाही. त्यात  संस्थेचे हित पहिले. ज्या वर आपले पोट चालते ती संस्था मोठी झाली पाहिजे हीच स्वप्न या माणसाने जीवनभर पहिली. 
माझ्या भाषणात मी समोर बसलेल्या शेकडो विधार्थ्याना सांगितले " पाठ्पुस्तकात आपल्याला चांगुलपणा हे मुल्ये शिकवले जाते पण त्याचे प्रक्टिकल आज आपल्या समोर चालू आहे. एक माणूस जीवनभर चांगला वागला तर त्याच्यावर सारी लोक अतोनात प्रेम करतात. हे आज आपल्या सगळ्यांना दिसले आहे. माणस आप्पांच्या साठी रडतात त्यांच्या डोळ्यात पाणी येते. पण सगळ्यात महत्वाचे आप्पांना काय मिळाले तर या वयातील गावाचा सत्कार आप्पांची वृद्ध आई पुढे बसून डब डबलेल्या डोळ्यांनी पाहत आहे. आपल्या लेकराचा हा सन्मान पाहताना आप्पांचे आणि त्यांच्या आईचे जीवन सार्थक झाले. जीवनातील कृतार्थ क्षण जगायला मिळाले हा चांगुलपणाचा विजय आहे". 
आप्पांचा सत्कार करत असताना त्यांची जेवढी सेवा झाली तेवढे माझे वय देखील नाही याची मला जाणीव होती पण तरीही आप्पांच्या जीवनातील या कृतार्थ क्षणी मला त्याच्या बरोबर काही वेळ राहता आले हा माझा सन्मान होता. मी देखील या समारंभात भारावून गेलो होता.

-- बिपीन जगताप 

४ टिप्पण्या: